
वाढदिवसानिमित्त मित्रांनी केक कापायला बोलावणे एका तरुणाला भलतेच महागात पडले. केक कापायला गेला असता मित्रांनी आधी त्याला हाताने मग दगड फेकून मारले. त्यानंतर एकाने दुचाकीत लपवून आणलेले पेट्रोल त्याच्या अंगावर ओतून तरुणाला पेटवून दिले. यात अब्दुल खान (21) हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ल्याच्या कोहिनूर फेजमध्ये अब्दूल शेख (21) हा तरुण राहतो. 25 नोव्हेंबर रोजी अब्दूलचा वाढदिवस होता. त्यामुळे 24 तारखेच्या रात्री 12 वाजता अयाज मलिक, अश्रफ मलिक, कासीम चौधरी, हुजैफा खान, शरीफ शेख या मित्रांनी अब्दूलला केक कापायला इमारतीखाली बोलावले. त्यानुसार अब्दूल इमारतीखाली येऊन केक कापत असताना मित्र अब्दूलला मारत होते तसेच त्यांच्या अंगावर दगड फेकत होते. याला अब्दूलने विरोध केला. तेव्हा अयाजने त्याच्या दुचाकीतून आणलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढल्यावर अश्रफ त्यातील पेट्रोल अब्दूलच्या अंगावर फेकू लागला. तेव्हा बाकीचे मित्र त्याला पकडू लागल्यावर अब्दूल त्यांचा हात झटकून पळू लागला. तेव्हा अयाजने त्याच्याकडील लायटर पेटवून ते अब्दूलच्या अंगावर फेकले. त्यामुळे अब्दूलच्या शर्टने पेट घेतला. यात अब्दूल गांभीर जखमी झाला. त्यांच्या तक्रारीवरून अयाजसह अन्य चौघांविरोधात विनोबा भावे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































