इटली नाही, ‘इथे’ होणार दीपिका आणि रणवीरचं लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

बाजीराव-मस्तानी, पद्मावत फेम दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र येणार आहेत. त्यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात 14 आणि 15 नोव्हेंबरला हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. पण हा लग्नसोहळा इटलीत नाही तर मुंबईतील वाकोला येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणार आहे. दोघांच्या कुटुंबीयांना इटलीत जाणे शक्य नसल्याने ऐनवेळी दीपिका-रणवीरने मुंबईतच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट आणि अनुष्काप्रमाणेच दीपिका आणि रणवीर देखील इटलीतील एका राजवाड्यात लग्न करणार, अशी चर्चा होती. पण कुटुंबीयांच्या अडचणी लक्षात घेत दीपिका आणि रणवीरने मुंबईत लग्न करण्याचे ठरवले आहे. सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या लग्नाची जबाबदारी ज्या वेडींग इवेंट कंपनीला देण्यात आली होती त्याच कंपनीला दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाची जबाबदारी सोपवली आहे. जवळच्या मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. 14 ला लग्न आणि 15 नोव्हेंबरला रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

दीपिका रणवीरने काही दिवसांपूर्वीच टि्वटरवर त्याच्या लग्नाची पत्रिका पोस्ट केली होती. यात त्यांनी कळवण्यास खूप आनंद होत आहे की कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आमच्या लग्नाची तारीख 14 व 15 नोव्हेंबर अशी ठरल्याचे या दोघांनी चाहत्यांना सांगितले होते. दीपिका रणवीरला अनेकवेळा मुलाखतीदरम्यान त्यांच्या लग्नाबद्दल विचारले गेले होते. त्यावेळी दोघांनी लग्नाची तारीख ठरली की आम्हीच तुम्हांला कळवतो असे म्हटले होते. टि्वटरवर लग्न पत्रिका पोस्ट करून त्यांनी मीडियाला दिलेला शब्द पाळला, असे आता बोलले जात आहे.

दीपिका आणि रणवीर यांची लव्हस्टोरी 2013 साली आलेल्या गोलियों की रासलीला : रामलीला या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सुरू झाली. पडद्यावर व पडद्याबाहेरही दोघांच्या जोडीला चाहत्यांनी तुफान पसंती दिली आहे.