प्लॅस्टिकच्या भस्मासुराला रोखण्यासाठी पवई आयआयटीच्या शास्त्रज्ञांचे ब्रह्मास्त्र

647

प्लॅस्टिकचा भस्मासुर रोखण्यासाठी प्लॅस्टिक बंदीसारख्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या मोहिमेत पवई येथील आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आठवडाभरात विघटन होणारे प्लॅस्टिक त्यांनी बनवले आहे. त्याचा वापर खाद्यपदार्थ आणि वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी करता येऊ शकतो.

आयआयटी मुंबईच्या बायोसायन्सेस ऍण्ड बायोइंजिनीयरिंग विभागातील शास्त्रज्ञ प्रा. रिंती बॅनर्जी आणि माधुरी सिन्हा यांनी या सहज विघटन होणाऱया प्लॅस्टिकसारख्या फिल्मची निर्मिती केली आहे. या प्लॅस्टिकचे विघटनही लवकर होते. ते बनवण्यासाठी कोणत्याही अपायकारक तत्त्वांचा वापर करण्यात आलेला नाही जी इतर प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी वापरली जातात. त्यामुळे आयआयटी मुंबईच्या या प्लॅस्टिकला अन्नसुरक्षा प्राधिकरणानेही मान्यता दिली आहे. औषधे व अन्य वैद्यकीय इम्प्लांट बनवण्यासाठी नॉन-टॉक्सिक म्हणजेच विषारी तत्त्वे नसलेले घटक वापरले जातात. त्यांचे शरीरामध्ये सहज विघटन होते. ते घटक बनवतानाच आयआयटीच्या शास्त्रज्ञांना विघटन होणाऱया प्लॅस्टिकमध्येही या घटकांचा वापर करता येईल अशी कल्पना सुचली. त्यातूनच विघटन होणाऱया प्लॅस्टिक फिल्मची निर्मिती झाली अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली. ही प्लॅस्टिक फिल्म अन्य प्लॅस्टिकपेक्षा स्वस्त आणि अनेक पटीने मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • पहिल्या टप्प्यात या प्लॅस्टिक फिल्मचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येणार आहे. दुसऱया टप्प्यात फळे, भाज्या अशा नाशिवंत वस्तूंसाठी केला जाणार आहे आणि तिसऱया टप्प्यात दूध आणि ज्यूससारख्या पातळ पदार्थांच्या पॅकिंगमध्ये केला जाणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या