
राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असले तरी मुंबईत मात्र सूर्य आग ओखत असल्याने तापमानाचा पारा 37 अंशापर्यंत वाढला आहे. त्यामुळे चाळीपासून टोलेजंग इमारतीपर्यंत आणि सरकारी कार्यालयापासून कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र एसी, पंखे, कूलर सुसाट धावत आहेत. त्याचा परिणाम थेट मुंबईच्या विजेच्या मागणीवर झाला असून एरवी तीन हजार मेगावॅटपर्यंत असलेली विजेची दैनंदिन मागणी गेल्या तीन दिवसांपासून 3510 मेगावॅटपर्यंत पोहचली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे 48 लाख वीज ग्राहक असून मार्चअखेरपर्यंत त्यांच्याकडून सरासरी 2800-3000 मेगावॅट एवढी दैनंदिन मागणी नोंदली जात होती. एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढू लागल्याने विजेच्या मागणीतही वाढ होऊ आहे. गेल्या दोन दिवसांत 3200 मेगावॅट तर आज 3510 मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अदानी, बेस्ट आणि टाटा पॉवरची विजेची मागणी नोंदली आहे. सदरची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या वीज केंद्रातून 961 मेगावॅट, अदानीच्या डहाणू वीज केंद्रातून 500 मेगावॅट तर एक्सचेंजमधून तब्बल 1425 मेगावॅट वीज घेण्यात आली आहे.
राज्याची मागणी 22 हजार मेगावॅटच्या घरात
मुंबईत विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदली असली तरी राज्यात मात्र अवकाळी परिस्थिती असल्याने महावितरणकडे 22 हजार 700 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली आहे. ती उच्चांकी मागणीच्या तुलनेत जवळपास अडीच हजार मेगावॅटने कमी आहे.
































































