
मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी आणि कांदिवली परिसरात घडली. घडल्याप्रकरणी डी. एन. नगर आणि समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
पहिली घटना अंधेरी परिसरात घडली. अंधेरी पश्चिमच्या स्वामी विवेकानंद रोड परिसरात फिरदोस स्वीट हे मिठाईचे दुकान आहे. त्या दुकानात मोहम्मद सलीम पटेल हा काही वर्षांपासून तेथे काम करत होता. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दुकानात पाणी साचू लागले. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुकानाचा मेन स्वीच बंद करण्यासाठी मोहम्मद हा गेला. तेव्हा दुकानातील फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट झाले. मोहम्मदला शॉक लागल्याने तो खाली पडला. त्याला त्याच्या इतर साथीदारांनी उचलून उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घडल्याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. दुसरी घटना कांदिवलीच्या पोईसर परिसरात घडली. पोईसरच्या बिहारी चाळीत राहणाऱया रितेश चंद्रकिशोर झा या तरुणाला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रितेश हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो बिहारी टेकडी परिसरात राहत होता. शनिवारी रात्री रितेशच्या घराजवळ पाणी साचण्यास सुरुवात केली. घरात पाणी शिरल्यास नुकसान होईल म्हणून तो घरातील सामान बिहारी टेकडी परिसरातील नाक्यावर शिफ्ट करत होता. सामान शिफ्ट करत असताना इलेक्ट्रिक बॉक्सच्या जोडणीला रितेशचा स्पर्श झाला. शॉक लागल्याने रितेश हा गंभीर जखमी झाला. रितेशला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी रितेशला मृत घोषित केले.




























































