
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्य परीक्षा परिषद ठाम असल्याचे परिषदेच्या वतीने सोमवारी जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकावरून स्पष्ट झाले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) ही जुलैमध्ये राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर घेण्याचे प्रस्तावित असल्याचे परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
शालेय शिष्यवृत्ती परीक्षा जुलैमध्ये प्रस्तावित असून या परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर पोहोचविण्यात येणार आहे. सदर साहित्याचे बॉक्स उतरवून घेण्यासाठी जिह्याच्या ठिकाणी अथवा कार्यालयात मध्यवर्ती व सुरक्षित ठिकाणाची निश्चिती करण्यात यावी, अशा सूचना परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱयांना दिल्या आहेत. या परिपत्रकामुळे शिक्षक तसेच पालकांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे.
राज्यातील सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. एकीकडे राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱया लाटेचा संभाव्य धोका ओळखून आतापासून सर्व यंत्रणा सज्ज करीत असताना परीक्षा परिषदेचा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी, असा सवाल विचारला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशभरातील दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेणे गरजेचे आहे का, अशी विचारणा पालक करीत आहेत.

























































