भायखळय़ाच्या बरूचा कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, 15 गाळे जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळ्याच्या बरूचा कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे 15 निवासी आणि व्यावसायिक गाळे जळून खाक झाले. मात्र अग्निशमन दलाने तातडीने कार्यवाही करून सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भायखळा पश्चिम येथील भायखळा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या बरूचा कंपाऊंड नंबर-2वर पैस सेंट येथे 15 एक मजली निवासी आणि व्यावसायिक गाळे आहेत, तर काही दुमजली गाळे आहेत. यातील काही गाळे बंद होते तर काही सुरू होते. या गाळ्यांना सकाळी 11 वाजता आग लागली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. जवानांनी 8 अग्निशमन बंब, चार लहान होस लाइन्स आणि दोन हायप्रेशर लाईनच्या मदतीने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.