महागडय़ा गिफ्टच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, लग्न जुळणाऱ्या संकेतस्थळावरून झाली होती ओळख

लग्न जुळणाऱया संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीने तरुणीला महागडय़ा गिफ्टच्या नावाखाली चुना लावल्याची घटना घडली. 20 लाख रुपयाची फसवणूक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार तरुणी ही अंधेरी परिसरात राहते. तिने लग्न जुळणाऱया संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. तरुणीला लग्नासाठी एक रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट पाठवणाऱयाने आपण अमेरिकेत डॉक्टर असल्याचे भासवले. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. त्याने तरुणीला महागडे गिफ्ट पाठवत असल्याच्या भूलथापा मारल्या.

काही दिवसांपूर्वी तरुणीला फोन आला. आपण दिल्ली विमानतळावरून बोलत आहोत. तुमचे अमेरिकेहून गिफ्ट आले आहे. ते महागडे गिफ्ट सोडवायचे असल्यास दंड भरावा लागेल असे तिला सांगण्यात आले. तिने त्यावर विश्वास ठेऊन काही रक्कम भरली. रक्कम भरल्यानंतर तरुणीला पुन्हा फोन आला.

आपण अमेरिकेहून दिल्ली विमानतळावर आलो आहे. ते गिफ्ट सोडवत असताना आपल्याला देखील दिल्ली विमानतळावर पकडले आहे. दंड भरल्याशिवाय आपली सुटका केली जाणार नाही. आपण बाहेर आल्यावर दंडाची रक्कम परत करू असे सांगून तरुणीला विविध बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.

तरुणीने भविष्यासाठी जमवलेली रक्कम आणि मित्राकडून उधार पैसे घेऊन तब्ब्ल 20 लाख रुपये विविध बँक खात्यात भरले. पैसे भरल्यावर फसवणुकीचा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. फसवणूक झाल्या प्रकरणी तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या