
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजनाचा नारळ आठ वर्षांपूर्वी फुटल्यानंतर येथील चकचकीत गुळगुळीत आणि रुंद रस्त्यांवरून सुसाट गावाला जाता येईल, या लाखो प्रवाशांच्या स्वप्नांचा साफ चक्काचूर झाला आहे. या महामार्गाच्या कामासाठी नेमलेल्या ठेकेदारांनीच गोलमाल केल्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण लटकले आहे. पळस्पे ते इंदापूरसाठी एकूण तीन ठेकेदारांना करोडो रुपयांचा निधी दिल्यानंतरही रस्त्याच्या कामाची सपशेल वाट लागली आहे. कामाच्या नावाने या करोडोंच्या निधीची वाटमारी केली जात असल्याचा संशय व्यक्त होत असून ठेकेदार आणि नॅशनल हायवे विभागाच्या अभद्र कारभारामुळे पळस्पे ते इंदापूर मार्गावरील चौपदरीकरण खड्डय़ात गेले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे व अरुंद रस्त्यांमुळे गेल्या अनेक वर्षांत असंख्य अपघात होऊन शेकडो प्रवाशांचे बळी गेले. या विरोधात पत्रकारांनी आवाज उठवून मोठे आंदोलन छेडले. त्यानंतर सरकारने 2011 साली मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू केले. एकूण 10 टप्प्यांत या महामार्गाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात रायगड जिह्यात पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते कशेडी या एकूण 161 कि.मी. अंतराचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुप्रीम व महावीर या कंपन्यांना देण्यात आले होते. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर हे काम बहाल करण्यात आले. या पहिल्या टप्प्याचे काम जून 2014 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. अचानक या कंपन्यांमध्ये मोठा आर्थिक घपला झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यापाठोपाठ या कंपन्यांनी आपली दिवाळखोरी जाहीर केली. तीन वर्षांत रस्त्यांचे इंचभरही काम झाले नाही आणि हा महामार्ग खड्डय़ातच राहिला.
सुप्रीम व महावीर कंपन्यांच्या दिवाळखोरीनंतर सरकारने याच पहिल्या टप्प्याचे काम 2018 मध्ये जे. एम.म्हात्रे या ठेकेदार कंपनीला दिले. त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन म्हात्रे यांच्या कंपनीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 700 कोटींचे कर्ज घेऊन दिले. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर टोल लावून बँकेचे कर्ज फेडण्याची अट घालण्यात आली. त्यात खारपाडा आणि सुकेळी खिंड येथे टोल बसवण्यास मंजुरी देण्यात आली. कर्नाळा खिंडीतील रस्त्याचा प्रश्न पर्यावरणवाल्यांनी उपस्थित केल्यानंतर या रस्त्याची परवानगीही सरकारने जे. एम.म्हात्रे कंपनीला दिली, परंतु 700 कोटी मिळूनही पहिला टप्प्याचा रस्ता साफ खड्डय़ात गेला आहे.
गणपतीला जाणाऱया चाकरमान्यांना शारीरिक व्याधींचे भोग
पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याची पूर्ण जबाबदारी ही जे. एम.म्हात्रे ठेकेदार कंपनीकडे देण्यात आली. गणेशोत्सवात लाखो चाकरमानी कोकणात जाणार असल्याने ते मुंबईतून निघण्याच्या आत या महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी जे.एम.म्हात्रे यांच्याकडे असतानाही त्याकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे या खड्डय़ातल्या रस्त्यातून प्रवास करताना मानमोडी, कंबरदुखीसारखे शारीरिक व्याधींचे भोग चाकरमान्यांना भोगावे लागले.
तकलादू पूल बांधून चुना लावला
जे.एम. म्हात्रे कंपनीने पेण रेल्वे स्थानक वाशी फाटा आणि कांदळपाडा ते गडब दरम्यान बांधलेले पूल म्हणजे सरकारला लावलेला अक्षरशः चुना आहे. चार महिन्यांपूर्वी बांधलेले हे पूल खड्डय़ात गेले असून पेण रेल्वे स्टेशनजवळील पूल केव्हाही कोसळेल अशा अवस्थेत आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या या पुलात सरकारचे करोडो रुपये हडप झाले आहे. जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनीही या कामाबद्दल शंका व्यक्त केली असून हे पूल कोसळल्यास ठेकेदार जबाबदार राहील असे लेखी जबाबनामा लिहून घेतला आहे.
इंदापूर ते कशेडीही रडतखडत
इंदापूर ते कशेडी या 77 कि.मी.च्या दुसऱया टप्प्याचे काम एल. ऍण्ड टी. या कंपनीला देण्यात आले आहे. एकूणच पळस्पे ते कशेडी या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया केली. त्यासाठी 700 कोटींची गरज होती. त्यात 500 कोटींचे वाटप झाले, परंतु अद्याप 200 कोटींचे वाटप न झाल्याने इंदापूर ते कशेडी मार्गावरील अनेक शेतकऱयांना मोबदलाच मिळालेला नाही. त्यामुळे या दुसऱया टप्प्याचे कामही रडतखडत सुरू आहे. पर्यायाने हा महामार्गही खड्डय़ात गेला आहे.
रायगडचा विकास खुंटला; स्थानिकांची रोजीरोटी बुडाली
रायगड जिह्यातून जाणाऱया या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेमुळे इथला विकास खुंटला आणि स्थानिकांची रोजीरोटी बुडाली. विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रायगड जिह्यात लाखो पर्यटक येतात, परंतु चौपदरीकरणाच्या नावाखाली अख्खा महामार्गच खड्डय़ात गेल्याने पर्यटकांनी या जिह्याकडे सपशेल पाठ फिरवली आहे. त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असलेल्या स्थानिकांची रोजीरोटी बुडाली आहे. श्रीवर्धन, दिवेआगर, रायगड, प्रतापगड, अलिबाग, मुरुड येथील स्थानिक व्यावसायिकांना मोठय़ा मंदीचा फटका बसला आहे. जिह्यात नवीन उद्योग आणि प्रकल्प येत आहेत, परंतु रखडलेले चौपदरीकरण आणि खड्डय़ांमुळे दळणवळणाची सुविधा कोलमडल्याचा फटका त्यांना बसत आहे.
‘नॅशनल हायवे’ नॉट रिचेबल
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्याची जितकी जबाबदारी ठेकेदाराची आहे तितकीच हे काम वेळेत आणि उत्कृष्ट दर्जाचे करून घेण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. चौपदरीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांनी या महामार्गाच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवल्या आहेत. सरकारकडून मिळालेल्या करोडो रुपयांची ठेकेदारांकडून लूट सुरू असताना नॅशनल हायवेचे अधिकारी डोळ्यांवर कातडे ओढून गप्प बसले आहेत. ठेकेदार आणि नॅशनल हायवे अधिकाऱयांचे साटेलोटे असल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप या मार्गावरून दणके खात प्रवास करणारे ठिकठिकाणचे स्थानिक गावकरी आणि प्रवासी करत आहे.





























































