मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ, खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यास कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी नसली तरी खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांच्या रस्त्यानेच जावे लागत आहे. तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात असून अनेक ठिकाणाहून बाह्य वळण देण्यात आलेली आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना सुखकर प्रवास करण्यास मिळावा यासाठी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे ठेकेदारांना भरण्यास सांगितले होते. ठेकेदारांमार्फत पडलेले खड्डे भरले गेले आहेत. पण वडखळ दरम्यान काही ठिकाणी खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. त्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तर पेव्हर ब्लॉकही वाहनांच्या रहदारीने दबले गेले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा खड्डे पडले आहेत.

कोकणात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची वर्दळ असल्याने वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात असून अनेक ठिकाणी बाह्य वळण देऊन वाहतूक फिरविण्यात आलेली आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी नसली तरी खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. रस्त्याची कामे अर्धवट असल्याने खड्डेमय रस्ताच प्रवाशांच्या नशिबी आला आहे.