मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दारुड्या डंपर चालकाने दुचाकीस्वारांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारुड्या डंपर चालकाने दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची धक्कादायक घटना मुंबई-गोवा महामार्गावर घडली. हा अपघात इतका भयंकर होता की यात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. आदित्य वाडकर, यश बल्लाळ अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे वाडकर आणि बल्लाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी डंपरचालक गौतम महतो याच्याविरोधात दादर सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विक्रोळी येथे राहणारे आदित्य वाडकर, यश बल्लाळ हे दोघे दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. ते पेण-पनवेल मार्गावरील खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर आले असता तर्राट डंपर चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार देत सुमारे दीड तास दोन्ही मृतदेह रस्त्यावरच ठेवले. अवैद्य गौण खनिज वाहतूक ही पेण आरटीओ आणि महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महसूल अधिकारी व उप प्रादेशिक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

परिसरात हळहळ

अपघाताची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.