
गोव्याला जाताना आता पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी सीएसएमटी ते करमाळी तेजस एक्सप्रेसला ऑगस्टपासून विस्टाडोम कोच बसविण्यात येणार आहे. त्यामुळे गोव्याला जाणार्या प्रवाशांना पारदर्शक छताच्या डब्यांतून कोकणातील निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे.
2018मध्ये प्रथम सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पारदर्शक छताचा विस्टाडोम कोच लावण्यात आला होता. या कोचना प्रवाशांची पसंती लाभल्याने मुंबई ते पुणे मार्गावरील खंडाळा व लोणावळा घाटातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘डेक्कन एक्स्प्रेस’ला 26 जून 2021 पासून ‘विस्टाडोम’ कोच लावण्यात आला.
त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरच धावणार्या ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेसला 15 ऑगस्ट 2021पासून विस्टाडोम कोच बसविण्यात आला. तर आता याच मार्गावरील प्रगती एक्स्प्रेसला 25 जुलैपासून ‘विस्टाडोम’ कोच बसविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी ते करमाळी धावणार्या तेजस एक्सप्रेसला येत्या ऑगस्टपासून विस्टाडोम कोच बसविण्यात येणार आहे.
विस्टाडोम कोचची वैशिष्ट्य…
मोठ्या आयताकार खिडक्या आहेत. तसेच एलईडी लाइट, रोटेटेबल सीट आणि पुश बॅक चेअर, टेलिव्हीजन स्क्रीन, विद्युत संचालित स्वयंचलित स्लायडींग कम्पार्टमेंट दरवाजे, दिव्यांगासाठी अधिक रूंद साइड स्लायडींग दरवाजे, पारदर्शक छत तसेच निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र व्हीविंग गॅलरी अशा सुविधा आहेत.
























































