मोसमी पावसाची राज्यात धुवाधार सलामी, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर रेड ऍलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याचा इशारा तंतोतंत खरा ठरवत आज मोसमी पावसाने राज्यात धुवाधार सलामी दिली. मुंबईतही विजांचा लखलखाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस ‘वाजतगाजत’ दाखल झाला. मुंबईत पावसाचा जोर इतका मोठा की रुळांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली. पश्चिम रेल्वेलाही मुसळधार पावसाचा फटका बसला. रस्ते वाहतूकही कोलमडल्याने कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अगदी पहिल्याच दिवशी

संपूर्ण मुंबईला पावसाने धो धो पछाड दिला !

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने वर्दी दिली होती. हवामान खात्यानेही 9 ते 11 जून या कालावधीत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला होता. यानुसार मंगळवारपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. मात्र बुधवारी सकाळपासून मेघगर्जनेसह विजांच्या लखलखाटात मुसळधार सुरू झाल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस सुरू असताना समुद्रालाही मोठी भरती आल्याने पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले. सकाळी 11.43 वाजता 4.16 मीटरची भरती आल्याने प्रचंड उंचीच्या लाटा उसळल्या. मुंबईत 9 जून रोजी आपत्कालीन स्थितीचा धोका सांगणारा अतिदक्षतेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेसह राज्याचीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती.

पाणी तुंबल्याने मोठी गैरसोय

मुंबईच्या हिंदमाता जंक्शन, शीव रोड नं. 24, शीव ब्रीजच्या खाली, सरदार हॉटेल काळाचौकी, षन्मुखानंद हॉल, माटुंगा, दादर टीटी सर्कल, बीपीटी कॉलनी या ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. तसेच पूर्व उपनगरात मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला गौरीशंकर नगर आणि पश्चिम उपनगरात अंधेरी सब-वे, खार सब-वे, मालाड सब-वे, मीलन सब-वे आदी ठिकाणीही पाणी तुंबले. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱयांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत होती.

सावधान! पुढील 5 दिवस मुसळधार

  • 9 जूनपासून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मान्सून सक्रिय झाला आहे. या ठिकाणी येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी सावधानतेचा ‘ऑरेंज’ अॅलर्ट देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याच्या शुभांगी भुते यांनी दिली.
  • दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा असतानाच उद्या 10 जून रोजी सकाळी 12.17 वाजता समुद्रात 4.26 मीटरच्या लाटा उसळणार असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

9 जूनचा पाऊस

  • कुलाबा – 45.6 मिमी (सकाळी 8 ते सायं. 5)
  • सांताक्रुझ – 220.6 मिमी (सकाळी 8 ते सायं. 5)
  • पालिकेच्या यंत्रणेवर नोंदवलेला पाऊस
  • शहर – 102.29 मिमी
  • पूर्व उपनगर – 169.17 मिमी
  • पश्चिम उपनगर – 137.33 मिमी

अशी झाली पडझड

मुसळधार पावसामुळे मुंबई शहर विभागात 2, पूर्व उपनगरात 2 आणि पश्चिम उपनगरात 2 अशा 6 ठिकाणी घरे-घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कुणीही जखमी झाले नाही. संबंधित विभागांकडून या ठिकाणी मदतकार्य करण्यात आले. तर शहर भागात 9 ठिकाणी, पूर्व उपनगरात 3 ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात 2 अशा 14 ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या.

हिंदमाताचा प्रश्न लवकरच सुटेल!

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हिंदमाता या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. साधारणतः 24 तासांत 500 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी समजली जाते. मात्र मुंबईत एका तासांत 50 ते 60 मिमी इतका प्रचंड पाऊस होण्याचे प्रमाण वाढल्याने काही भागांत पाणी साचत असल्याचे आयुक्त यावेळी म्हणाले. हिंदमाता या ठिकाणी 4 फूट उंचीचे रस्ते तयार केल्याने या ठिकाणची वाहतूक यावेळी थांबली नाही. पंधरा वर्षांत प्रथमच असा दिलासा मिळाला आहे. भूमिगत टाक्यांचा प्रयोग या ठिकाणी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या कायमची सुटेल. गांधी मार्पेटजवळच्या प्रकल्पामुळे या ठिकाणची पाणी साचण्याची समस्या सुटेल असेही आयुक्त म्हणाले.

पाण्याचा निचरा लवकर होतोय

मुंबईत पाणी साचल्याचे प्रकार घडत असले तरी काही ठिकाणी तासाभरात तर एक-दोन ठिकाणी चार तासांत पाण्याचा निचरा होत असल्याचे पाहणी करताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असलेली कामे पालिकेच्या माध्यमातून झाली आहेत. मात्र समुद्राला भरती असल्यास फ्लड गेट बंद ठेवावे लागतात. तसेच मुंबईची भौगोलिक रचना पाहता पाणी साचण्याचे प्रकार घडतातच. पण आवश्यक कामे केल्याने आता पाण्याचा निचरा लवकरच होत आहे. पाऊस सतत सुरू आहे. त्यामुळे पुण्यासारख्या शहरातही पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. केवळ आरोप करायचे म्हणून करायचे असे चालणार नाही तर परिस्थितीही समजून घेतली पाहिजे, असा टोलाही त्यांनी आरोप करणाऱया विरोधकांना लगावला. महापौरांनी मुसळधार पावसात विविध भागांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, उपायुक्त प्रभात रहांगदळे, आपत्कालीन विभागाचे महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पावसावर वॉच

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱयानुसार मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिह्यांत काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा इशारा देण्यात आला तेव्हापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील यंत्रणांच्या संपका&त आहेत. आज मुसळधार पाऊस पडत असताना मुंबई महापालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून ते सतत परिस्थितीची माहिती घेत होते. राज्यात कुठेही वाईट घटना घडून नुकसान होणार नाही यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सतत सतर्क ठेवत मुख्यमंत्री ठाकरे हे सतत लक्ष ठेवून होते.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदतकार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले.

कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. मुंबईत पंपिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहा. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करा.

महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षास आज दुपारी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासह निरनिराळ्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. मुंबईतील हिंदमाता, मिलन सबवे यासह सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती घेतली. किती पंप पाणी उपसा करीत आहेत, पंपिंग स्टेशनची काय स्थिती आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.