
मुंबईत रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 75 ठिकाणी झाडे-फांद्या पडल्या, 5 ठिकाणी घर, भिंतींची पडझड झाली, 16 ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. सखल भागामुळे 13 ठिकाणी पाणी साचले. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा केला. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शुक्रवारपासून पावसाने जोर धरला असून रविवारी पहाटेपासून सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या 75 घटना घडल्या. यात शहरात 21, पूर्व उपनगरात 20 तर पश्चिम उपनगरात 34 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. शहर आणि उपनगरात भिंत आणि घराच्या पडझडीच्या प्रत्येकी दोन घटना तर पश्चिम उपनगरात 3 अशा एकूण 5 घटना घडल्या तर मुंबईत 2, पूर्व उपनगरात 2 आणि 12 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. मुंबई आणि उपनगरात रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमातासह 13 सखल ठिकाणी पाणी साचले. काही ठिकाणी बेस्टच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले. पालिका कर्मचाऱ्यांनी मॅनहोलचे झाकण उघडून पाण्याचा निचरा केला. दरम्यान, रविवारी सहा वाजेपर्यंत मुंबईत 26.73 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 76.39 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 62.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.






























































