माशांऐवजी वांग्याची भाजी बनवल्याने आईची हत्या! हायकोर्टाकडून आरोपी मुलाच्या शिक्षेत बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माशांऐवजी वांग्याची भाजी बनवल्याने आईची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या करणाऱया आरोपी मुलाच्या शिक्षेत हायकोर्टाने बदल केला आहे. न्यायालयाने ‘आयपीसी’अंतर्गत नोंदवलेले कलम 302 (हत्या) बदलून त्या ऐवजी आयपीसी 304 (हत्याऐवजी सदोष मनुष्य वध) या कलमांतर्गत शिक्षा ठोठावली आहे. डोंबिवलीतील निळजेपाडा येथे नरेश पवार हा वीटभट्टीवर काम करतो. 19 मार्च 2011 साली होळी असल्याने तो घरीच होता.

आईने माशांऐवजी वांग्याची भाजी बनवल्याने नरेशचा राग विकोपाला गेला. त्याने लोखंडी सळीने आईला बेदम मारले. यात आईचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयाने नरेशला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला त्याने हायकोर्टात आव्हान दिले.

न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील सुशील इनामदार यांनी खंडपीठाला सांगितले की, नरेश याने आईचा जाणूनबुजून खून केला नाही, रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याने आईचा मृत्यू झाला. तसेच अपीलकर्ता गेल्या नऊ वर्षांपासून तुरुंगात आहे. सरकारच्या वतीने एच. जे. देढिया यांनी आरोपीच्या अर्जाला विरोध करत याचिका फेटाळण्याची मागणी केली. खंडपीठाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला अंशतः दिलासा दिला. कल्याण सत्र न्यायालयाने आयपीसी 302 कलमांतर्गत आरोपीला ठोठावलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला व त्याऐवजी आयपीसी अंतर्गत 304 (2) नुसार गुन्हा दाखल करण्याचे सत्र न्यायालयाला आदेश दिले.