
पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने उच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता नसलेल्या दुसऱया पत्नीलाही नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरी पत्नी पतीवर निर्भर होती. तिलाही नुकसानभरपाईची रक्कम मिळायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पहिल्या पत्नीसोबत घटस्पह्ट न घेता पतीने दुसरा विवाह केला होता. अशा विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे दुसऱ्या पत्नीला नुकसानभरपाई देता येणार नाही, असे स्पष्ट करत नाशिक मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने दुसऱ्या पत्नीला नुकसानभरपाई नाकारली होती. त्याविरोधात या पत्नीने न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. शिवकुमार दिघे यांच्या एकल पीठासमोर या अपील याचिकेवर सुनावणी झाली. दुसऱया विवाहाला मान्यता नसली तरी अपघाती निधन झालेल्या व्यक्तीसोबत दुसरी पत्नी राहत होती. ती पतीवर निर्भर होती. परिणामी तीदेखील नुकसानभरपाईच्या रकमेसाठी पात्र ठरते, असे न्यायालयाने नमूद केले. दुसरी पत्नी असल्याचे मान्य करूनही मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने नुकसानभरपाई का नाकारली याचा अर्थ लागत नाही. त्यामुळे आम्ही दुसऱया पत्नीलाही नुकसानभरपाईमधील 20 टक्के रक्कम देण्याचे आदेश देत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नुकसानभरपाई रकमेत वाढ
नुकसानभरपाईची 8 लाखांची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी पहिल्या पत्नीने केली होती. ही मागणीदेखील न्यायालयाने मान्य केली. या रकमेत न्यायालयाने सहा लाखांची वाढ केली. विमा कंपनीने वाढीव रक्कम सात टक्के व्याजासह सहा आठवडय़ांत द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.



























































