हायकोर्टाचा दणका; पॅराशूटच्या बनावट बाटल्या विकल्या, 25 हजारांचा दंड टाटा रुग्णालयात जमा करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

रतिंद्र नाईक

हुबेहूब पॅराशूट तेलाच्या बाटल्या बनवून त्याद्वारे तेलाची विक्री केल्याचा गैरप्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. याचा धसका घेत पॅराशूट तेल बनवणाऱ्या मारिको कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. हायकोर्टाने याप्रकरणी डुप्लीकेट तेल बनविणाऱ्या व्यावसायिकाला दणका देत चांगलेच फैलावर घेतले. एवढेच नव्हे तर दंड म्हणून 25 हजार रुपये टाटा रुग्णालयात भरण्याचे आदेश दिले.

मानखुर्द येथे राहणाऱया एका व्यावसायिकाने पॅराशूट ऑइलच्या 175 मिली आणि 250 मिलीच्या बाटल्या बनवल्या. जवळपास 60 हजार बाटल्या बाजारात विकल्यानंतर मारिको कंपनीला याची कुणकुण लागली. ट्रेडमार्क तसेच कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत मारिको लिमिटेड कंपनीने हायकोर्टात सूट दाखल केले. संबधितांवर कारवाई करून हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा तसेच नुकसानभरपाईपोटी 20 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी केली. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने या याचिकेची गंभीर दखल घेत या व्यावसायिकाला खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर शिक्षा म्हणून 25 हजार रुपये टाटा मेमोरियल रुग्णालय येथे आठवडाभरात जमा करण्याचे आदेश दिले. प्रतिवादी असलेल्या व्यावसायिकाने सदर पैसे रुग्णालयात भरल्याची माहिती ऍड. हर्षल मिराशी यांनी दिली.

कोणाला विकले, कुठे उत्पादन घेतले?
सुनावणीवेळी हायकोर्टाने बनावट तेलाच्या बाटल्यांचे उत्पादन कुठे घेतले, सदर बाटल्या कोणाला विकल्या याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. एवढेच काय तर बाटल्यांची विक्री व प्रोडक्शन थांबविण्याचे आदेश दिले होते, परंतु व्यावसायिकाने कोर्टाने दिलेल्या मुदतीत कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही शिवाय तेलाच्या बाटल्यांची विक्रीही सुरूच ठेवली.