
मुंबई महापालिकेने बेकायदेशीर ठरवत कारवाई केलेल्या विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने पावसाळ्यात मंदिरावर तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र कोर्टाने ट्रस्टची कोणतीही मागणी मान्य करण्यास नकार देत पालिका प्रशासनाकडे याप्रकरणी अर्ज करण्याचे निर्देश ट्रस्टला दिले आहेत.
मुंबईत पावसाळी वातावरण असून जैन मंदिराचे काही बांधकाम अद्याप शिल्लक आहे. त्या बांधकामावर तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत श्री 1008 दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने हायकोर्टात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आज बुधवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकल पीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने अॅड. जोएल कार्लोस यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलीस पंचनाम्यात नोंद केल्याप्रमाणे मूर्ती सुपूर्द केल्यानंतर ट्रस्टने पुन्हा त्याच इमारतीत मूर्ती आणली, जे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध होते. ज्या खंडपीठाने स्थगिती आदेश दिला आहे त्या खंडपीठाकडेही ट्रस्टला अर्ज करता आला असता; मात्र ट्रस्टने तसे केले नाही. न्यायालयाने याची दखल घेत ट्रस्टला याप्रकरणी पालिकेकडे दाद मागण्यास सांगितले व सुनावणी तहकूब केली.