पुण्यातील विक्रम गायकवाड हत्या- महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणावे का? हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण, ऑनर किलिंगच्या तपासाचा मागितला तपशील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे येथील विक्रम गायकवाडची हत्या ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपात तथ्य असल्यास महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणावे का? असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

ही हत्या म्हणजे ऑनर किलिंगचा प्रकार असेल तर प्रशासनासाठीदेखील ही चिंतेची बाब आहे, असेही न्या. अजय गडकरी व न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने नमूद केले. विक्रम गायकवाडची हत्या ऑनर किलिंग होती का, यादृष्टीने पोलिसांनी तपास केला आहे की नाही याची माहिती पुणे पोलीस अधीक्षक (ग्रामिण) यांनी प्रतिज्ञापत्रावर द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे.

पोलिसांत चुकीची नोंद

विक्रम व अनुज चव्हाण यांच्यात पैशाचे वाद होते. त्यातूनच ही हत्याच झाल्याची नोंद पोलीस उप निरीक्षण चव्हाण यांनी केली आहे. मात्र आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की विक्रमची हत्या हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे, असा दावा न्यायालयात करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

आंतरजातीय विवाहामुळे हत्या

विक्रम बौद्ध समाजाचा असून त्याची पत्नी मराठा समाजाची आहे. माझे कुटुंबीय तुझी हत्या करतील, असे विक्रमच्या पत्नीने सांगितले होते. त्यानंतर विक्रमची हत्या झाली. विक्रमच्या सासरच्यांना हा विवाह मान्यच नव्हता. त्याच रागातून ही हत्या झाली आहे. या हत्येच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करावे, अशी मागणी करत विक्रमचा भाऊ सागर गायकवाडने याचिका दाखल केली आहे.

फेब्रुवारीतील घटना

ही घटना 8 फेब्रुवारीला घडली. विक्रमची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही हत्या म्हणजे ऑनर किलिंगचा प्रकार असल्याच दावा आंबेडकरी संघटनांनी केला. यासाठी निषेध मोर्चाही काढण्यात आला होता.