आता गृहनिर्माण सोसायट्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे मोफत धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका आता गृहनिर्माण सोसायटय़ांनाही आपत्ती व्यवस्थापनेचे मोफत धडे देणार आहे. विलेपार्ले आणि साकीनाक्यातील आशापुरा कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर वित्तहानी आणि प्राणहानी टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. वॉर्डानुसार छोटय़ा-मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मुंबईत आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच विलेपार्ल्यातील लाभ श्रीवली इमारतीलाही भीषण आग लागली, मात्र या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली. पण मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली. साकीनाक्यातील आशापुरा कंपाऊंडमधील रासायनिक गाळ्यांना लागलेली आग तर त्याहून भीषण होती. त्यामुळे काही काळ विमानसेवाही विस्कळीत झाली. या आगीत 30 ते 35 गाळे आणि गोदामे जाळून खाक झाली तर त्यात दोघांचा मृत्यू झाला. एकजण अजूनही बेपत्ता आहे. त्यामुळे दुर्दैवाने आग लागलीच तर जीवित व वित्तहानी कमी करून रहिवाशांनी सुरक्षितपणे बाहेर पडावे यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

रासायनिक कारखाने, गोदामे पालिकेच्या रडारवर

खैरानी रोडवरील आगीनंतर मुंबईतील रासायनिक कारखाने, गोदामे, गाळे पालिकेच्या रडारवर आले आहेत. नव्या वर्षात ही कारवाई तीव्र केली जाणार असून नियम धाब्यावर बसवणाऱयांवर कठोर कारवाई होईल. विशेषतः रासायनिक कारखाने, गोदामे यांच्याकडे पालिकेने मोर्चा वळवला असून त्यांची तपासणी होणार आहे. यात अग्निशमन सुरक्षा व्यवस्था आहे की नाही याचीही तपासणी होईल. मुंबईतील रासायनिक कारखान्यांची तपासणी आजपासून सुरू झाली आहे. तसेच छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांकडे फायर परवाना नसतानाही अनधिकृतपणे व्यवसाय करीत असल्याचे आढळले आहे.