
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई शहरात मेट्रो रेल्वेच्या कामामुळे वाट लागली आहे. सर्वच ठिकाणी रस्ते खणण्याची गरज नव्हती. व्हर्टीकल म्हणजे एक उभा खड्डा करून त्यातून यंत्रसामग्री आत सोडता आली असती. खाली काम सुरू असताना वरती कोणालाही समजता कामा नये पण आपल्याकडे मेट्रोच्या कामामुळे गोंधळ निर्माण झाला आहे असे स्पष्ट मत मुंबई आयआयटीच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम इंजिनीयरिंगचे प्राध्यापक तसेच वाहतूक आणि पायाभूत सुविधांमधील तज्ञ डॉ. एस. एल. धिंग्रा यांनी व्यक्त केले आहे. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
डॉ. धिंग्रा हे वांद्रे-वरळी सी लिंक प्रकल्पाचे सल्लागारही होते. सध्या ते आंध्र प्रदेश सरकारचे प्रकल्प सल्लागारही आहेत. ‘मुंबई इफ्रास्ट्रक्चर ग्लोबल समिट’च्या निमित्ताने मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. मुंबईत भुयारी मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आखला असता तर प्रकल्पाची किंमत अडीच पटीनी कमी झाली असती. पश्चिम उपनगरासारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी तर भुयारी मेट्रो रेल्वेची गरज असताना त्या ठिकाणी मेट्रो रेल्वे एलिव्हेटेड का केली असा प्रश्न यांनी विचारला. भुयारी रेल्वे किफायतशीर ठरते. एलिव्हेटेड मार्गापेक्षा भुयारी मेट्रोचा खर्च 2.2 ते 2. 5पटीनी कमी होतो. भुयारी मेट्रो रेल्वेमुळे प्रकल्पाची किंमत अडीच पटीनी कमी होईल असे मी 2009मध्येच सांगितले होते असा दावा डॉ. धिंग्रा यांनी केला.
मुंबईत लोकसंख्येची घनता व दाटीवाटीचे ठिकाण सध्या पश्चिम उपनगरात आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात भुयारी मेट्रोची गरज होती पण तरीही एलिव्हेटेड मेट्रोचा प्रकल्प आखला.
– डॉ. एस. एल. धिंग्रा
मेट्रो रेल्वेला विलंब
मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होईल का असा प्रश्न डॉ. धिंग्रा यांना केला असता या प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मी वांद्रे-वरळी सी लिंक प्रकल्पावरही सल्लागार होतो. हा प्रकल्प 2003 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते पण वांद्रे-वरळी सी लिंक प्रकल्प 2010 मध्ये पूर्ण झाला. मेट्रो रेल्वे प्रकल्पालाही विलंब होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वृक्षप्रेमींचा विरोध, न्यायालयीन प्रकरणे अशा विविध कारणांमुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला विरोध होईल असे ते म्हणाले.
अंमलबजावणी नाही
मोनो रेल्वेला आग लागली होती याची आठवण करून देताना ते म्हणाले की, मोनोसाठी मी आपत्कालीन आराखडा दिला होता पण त्याची अंमलबजावणी झाली नाही असा दावा डॉ. धिंग्रा यांनी केला. आता आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची योजना तयार करण्यासाठी बाहेरून माणसे बोलावत आहेत त्याचा खर्च दहा पटीनी अधिक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
























































