
सामना प्रतिनिधी, मुंबई
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्ने, नव्या आशा, नवी उमेद आणि नावीन्याची कास धरत नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. तरुणाईला तर उधाणच आले आहे. थर्टी फर्स्टला सोमवार असला तरी सोमरसाचे प्याले रिचवायची पूर्ण तयारी झाली आहे. तरुणाईचे हे प्लॅनिंग सक्सेस करण्यासाठी मुंबईतील हॉटेल्स, मॉल्ससह विविध प्रेक्षणीय स्थळे सजली आहेत.
31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. मुंबईकरांनी या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. कुठे जायचे याचे प्लॅन तयार आहे. नववर्षाच्या पाटर्य़ांसाठी हॉटेलांची बुकिंगही झाली आहे. बोरिवलीपासून हाकेच्या अंतरावरील एस्सेल वर्ल्ड ‘मेगानाइट’साठी रोषणाईने नटले आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री हजारो मुंबईकरांचा जल्लोष होतो. नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ गोराई बीच, मरीन ड्राइव्ह, जुहू या चौपाटय़ांवर फटाक्यांची आकर्षक आतषबाजी व्हायची, परंतु कायद्याची बंधने आल्याने यावेळी आकाश लखाखणार नाही, मात्र चौपाटीवर जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे प्लॅन अनेकांनी बनवले आहेत.
नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने
नवीन वर्षाची सुरुवात अनेकजण देवदर्शनाने करतात. त्यासाठी शिर्डी, अष्टविनायक, भीमाशंकर, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट येथे गर्दी होते. यंदाही या तीर्थस्थळांच्या परिसरातील धर्मशाळा, हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत.
कुठे कुठे जायाचं थर्टी फर्स्टला
गोराई मनोरी बीच, एस्सेल वर्ल्ड, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, अर्नाळा बीच, केळवे माहीम, इमेजिका मॉल, फिनिक्स मॉल, आर मॉल, मॅक्डोनाल्डस, केएफसी.
अख्खे पोलीस दल रस्त्यावर
मदिराप्रेमींसाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बार पहाटेपर्यंत उघडे राहणार आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टचा आनंद अगदी नवे वर्ष उजाडेपर्यंत घेतला जाऊ शकणार आहे. तळीरामांच्या स्वागतासाठी बारही रोषणाईने उजळले आहेत. प्रत्येक बारबाहेर पोलीसमामाही सुरक्षेसाठी बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करताना काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून अख्खे पोलीस दल उद्या रस्त्यावर बंदोबस्तासाठी असणार आहे. थोडीशी पोटात टाकून वेगाची मजा घेणाऱया बाईकस्वारांचे नाक्यानाक्यांवर ‘ब्रेथ ऍनालायझर’ घेऊन पोलिसांकडून स्वागत होणार आहे.





























































