
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे गर्दी करू नये असे आवाहन केले असल्याने भीमसैनिकांनी संयम दाखवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ऑनलाइन अभिवादन केले. हाच धागा पकडून राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या पद्धतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनो पोस्टकार्ड लिहून चैत्यभूमी ही आम्हा सर्वांची ऊर्जास्रोत आहे. इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील, महापरिनर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन अशा शब्दांत वंदन केले.
जयंत पाटील या आपल्या पत्रात लिहितात, देशभरातील कोविडचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करीत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत, म्हणून देशहितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय.
आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्याचं आम्ही रक्षण करू! चैत्यभूमी ही आम्ही सर्वांचीच ऊर्जास्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच ऊर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
























































