
म्युकरमाकोसिस, डेल्टा आणि डेल्टा प्लससारख्या कोरोनाच्या बदलत्या घातक स्वरूप ओळखणाऱया ‘जिनोम सिक्वेंसिंग’ चाचण्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 196 सॅम्पल टेस्टिंग मशीनमध्ये ठेवण्यात आले असून दोन दिवसांत त्यांचा रिपोर्ट मिळणार आहे. यामुळे स्ट्रेन बदलणाऱया विषाणूंच्या चाचण्यांसाठी लागणारे दोन महिन्यांचे वेटिंग संपणार आहे. त्यामुळे वेळीच निदान झाल्याने वेळेवर उपचार करणे शक्य होणार असून नव्या स्ट्रेनचे आजार रोखता येणार आहेत.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाने आता स्ट्रेन बदलून हल्ला सुरू केल्याने धोका वाढला आहे, मात्र अशा बदललेल्या स्ट्रेनच्या विषाणूची चाचणी करण्यासाठी मुंबईत सुविधा नसल्याने हे नमुने पुण्याला पाठवावे लागत होते. या चाचण्यांचा अहवाल येण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने आजार पसरण्याचे प्रमाण वाढत होते. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेतून अत्याधुनिक ‘जिनोम सिक्वेंसिंग’ चाचण्यांचे मशीन आणले गेले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिनोम सिक्वेंसिंग लॅबचे लोकार्पण करण्यात आले. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे या चाचण्यांसाठी आवश्यक सॅम्पल मिळत नव्हते, मात्र आता पुरेशी सॅम्पल जमा झाल्याने टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे.
जिनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यात 196 सॅम्पलची चाचणी होणार आहे. याचा रिपोर्ट आल्यानंतर सोमवारी या विषाणूचा स्ट्रेन कोणता हे समजेल. यानंतर पुढच्या टप्प्यात एका वेळी 384 सॅम्पलची चाचणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. – डॉ. जयंती शास्त्री, कस्तुरबा रुग्णालय
अशी आहे ‘जिनोम सिक्वेंसिंग लॅब’
- नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग ही पद्धती वापरून विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते.
- जिनोम सिक्वेंसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड–19 विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जिनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे.

































































