
भायखळा येथे मुंबईचे हेरिटेज वैभव असणारा खडा पारसी पुतळा लवकरच एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. पुतळ्याच्या दुरुस्तीचे काम याआधीच पूर्ण झाले असून आता रेलिंग आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. येत्या दीड महिन्यात हा खडा पारसी आपल्या ऐतिहासिक रुबाबात मुंबईकरांना पाहता येणार आहे.
भायखळा रेल्वे स्टेशन परिसरात उत्तुंग उंचीचा धातूपासून तयार करण्यात आलेला कलात्मक खडा पारसी पुतळा आहे. मुंबईतील धनाढय़ पारशी व्यापारी करसेटजी माणेकजी श्रॉफ यांच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. स्तंभांच्या पायथ्याला चार दिशांना चार युवती अर्धा मत्स्याच्या आकारात तुतारी वाजवण्याच्या स्वरूपात आहेत. पुतळ्याच्या स्तंभावरही मनमोहक नक्षीकाम केलेले आहे. पुतळ्याचा चौथराही नक्षीकामाने आकर्षक करण्यात आलेला आहे. दरम्यान, पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून हे काम करण्यात येत आहे. या विभागाकडून मुंबईचे हेरिटेज वैभव असणारे प्याऊ, कारंजे, मैलाचे दगड आणि हेरिटेज इमारतींचे सौंदर्य जपण्याचे, पुरातन वास्तू जपण्याचे काम केले जात आहे.
उपद्रव वाढल्याने होतेय रेलिंग
भायखळ्यात रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱया हेरिटेज पुतळ्याला रेलिंग नसल्याने भिकारी आणि काही समाजपंटकांचा उपद्रव वाढला होता. दिव्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार घडतात. मात्र या ठिकाणी पहारा, सुरक्षा ठेवणेही शक्य नसल्याने हेरिटेज खडा पारसी पुतळ्याजवळ काही कचऱयाचे साम्राज्य तर कधी पुतळ्याजवळील नक्षीकामाची मोडतोड केल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून पुतळ्याला रेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 11 लाखांचा खर्च करण्यात येत असून दीड महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.
असे आहे महत्त्व
करसेटजी माणेकजी हे गिरगाव चौपाटीसमोर बंगल्यात राहत. मुंबईत गॅसचे दिवे प्रथम क्रॉफर्ड मार्पेटमध्ये बसवण्यात आले होते. माणेकजी करसेटजी श्रॉफ यांनी स्वखर्चाने गॅसचे दिवे त्यांच्या घरात प्रथम लावले होते. त्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या पुतळ्याच्या खाली चारही बाजूंना गॅसचे मनमोहक दिवे लावण्यात आले होते, मात्र आता या ठिकाणी गॅस लाइन नसल्याने एलईडी दिवे लावले जाणार आहेत.



























































