मुंबईकरांनी पैशांचा धूर केला नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी हा सण मांगल्याचा, लख्ख रोषणाईचा असल्याचे भान ठेवत यंदा मुंबईकरांनी पैशाचा धूर टाळला. पहिली आंघोळ; त्यात लक्ष्मीपूजन आल्याने एकाच दिवशी फटाक्यांचा धूमधडाका उडणार असा अंदाज असताना तो अक्षरशः फोल ठरला. मागील वर्षापेक्षा यंदा फटाक्यांची आतषबाजी अर्ध्याने कमी झाली असून अधिकाधिक मंगलमय दीपावली साजरी करण्यावर मुंबईकरांचा भर आहे.

आर्थिक मंदी, महागाई यामुळे हैराण झालेल्या चाकरमान्यांनी यंदा फटाक्यांना फाटाच दिला. त्यामुळे फटाके खरेदीपेक्षा कपडे, सोने-चांदी खरेदीवर मुंबईकरांनी भर दिला. यामुळे मुंबईतील वायू तसेच ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी खाली आली. मागील वर्षीपेक्षा हे प्रमाण अक्षरशः निम्म्यावर आले. यामुळे नरकचतुर्दशीच्या पहाटेच वाजणारे, त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या रात्री वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाजच दाबला गेला. फटाके फोडण्यापेक्षा पहाटे दिवाळी पहाटचे कार्यक्रम करून दिवाळी सूरसंगीताने साजरी करण्याचे तर खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे पूजन करून ती मंगलमय करण्याकडे चाकरमान्यांचा कल राहिला. हे ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजणाऱ्या ‘आवाज फाऊंडेशन’च्या नजरेतूनही सुटले नाही.

मागील वर्षीपेक्षा यंदा फटाक्यांची आतषबाजी अत्यंत कमी झाली आहे. सकाळपासून फारच कमी फटाक्यांचा आवाज झाल्याचे ‘आवाज फाऊंडेशन’च्या समायरा अब्दुलाली यांनी सांगितले. विविध स्तरांतून पर्यावरण विषयावर करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळेही फटाक्यांचे प्रमाण वर्षानुवर्षे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

लक्ष्मीपूजनाला साधला लग्नासाठी सोने खरेदीचा मुहूर्त
मागील दोन-तीन महिन्यांत 28 हजारांवरून थेट 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले सोने आणि त्यातच बँकांवरून उडालेला भरोसा यामुळे सोन्यात गुंतवणुकीला ग्राहकांनी प्राधान्य दिले आहे. आर्थिक मंदी असली तरी पारंपरिक सोनेखरेदी काही कमी झालेली नाही. उलट सोन्याच्या चढय़ा भावामुळे दोन-तीन महिने थांबलेल्या ग्राहकांनी येणाऱया लग्न सराईचा विचार करत लक्ष्मीपूजनाला सोने खरेदीचा मुहूर्त साधला. तोळ्या-तोळ्याचे सोने घेण्यापेक्षा काही ग्रॅममध्ये अधिकाधिक दागिने कसे घेता येतील याकडे ग्राहकांचा कल असल्याचे जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या आनंद पेडणेकर यांनी सांगितले.