मुंबईतील 100 वर्षे जुन्या एलआयसीच्या इमारतींचा तातडीने पुनर्विकास करा

341

लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनच्या मुंबईतील काही इमारती तब्बल 100 वर्षे जुन्या झाल्या आहेत. या इमारतींमध्ये कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यांचे संपूर्ण जीवनच धोक्यात आहेत. त्यामुळे लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनने तातडीने निर्णय घेऊन या इमारतींचा पुनर्विकास करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

एलआयसीच्या जुन्या इमारतींच्या प्रश्नी खासदार, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आज एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार आणि कार्यकारी संचालक एस. एस. नाडकर्णी यांची भेट घेतली. एलआयसीच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करावा किंवा म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकारची मदत घ्यावी आणि जॉइंट व्हेन्चर तत्त्वावर पुनर्विकास करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली. एलआयसीच्या काही इमारतींना 100 वर्षे झाल्याने त्या अक्षरशः मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱया एलआयसी कर्मचाऱयांची कुटुंबे प्रचंड दहशतीखाली या इमारतींमध्ये वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, टेनंट असोसिएशनचे पदाधिकारी अशोक राऊत, रमेश निर्मळ, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष गोपाळ शेलार आणि सरचिटणीस महेश लाड आदि उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या