1 जानेवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार, विजय वडेट्टीवार यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मागील सात-आठ महिन्यांपासून ठप्प झालेली मुंबईची लाइफलाइन नव्या वर्षात पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना बऱयापैकी नियंत्रणात येत आहे. त्यामुळे नवीन वर्षात 1 जानेवारीपासून लोकल ट्रेन सुरू करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधान भवनात पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबईतील लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली. ट्रेनमधील वाढती गर्दी व थंडीमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. मुंबईत ट्रेनमधील गर्दी लक्षात घेऊन काळजी घ्यावी लागणार आहे. रुग्णांची संख्या घटली आहे व दुसऱया लाटेचीही भीती निवळली आहे. त्यामुळे लोकल ट्रेन सुरू करण्यापूर्वी पुढील 15 दिवस नियोजन करण्यात येईल. विनामास्क प्रवासी ट्रेनमध्ये शिरणार नाहीत आणि गर्दी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा लागेल व इतर मदतीसाठी पुढील 15 दिवसांचा वेळ लागेल. थोडा वेळ जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी पोलीस यंत्रणा लागेल व इतर मदतीसाठी सर्व चाचपणी पूर्ण झाली आहे.

ट्रेन सुरू करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. लोकलला रुळावर आणून सर्वसामान्यांची सेवा नवीन वर्षात सुरू होईल.