धारावीतून कोरोनाची हकालपट्टी सुरूच, दुसऱया लाटेत आठव्यांदा एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून फेब्रुवारी मध्यापासून सुरू झालेल्या दुसऱया लाटेदरम्यान आज आठव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱया दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये 2 तर माहीममध्ये 4 रुग्ण सापडले.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले असून धारावीत आज आठव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. सक्रिय रुग्णांचीही संख्या गेल्या एक आठवडय़ात कमी झाली असून 38 वरून 35 वर पोहोचली आहे. धारावीत याआधी 14, 15, 23 जूनला तर 4, 7, 17 जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता तर ऑगस्ट महिन्यात 3 तारखेला धारावीत एकही रुग्ण सापडला नव्हता.

दादर, माहीममध्ये सक्रिय रुग्णसंख्येत चढउतार
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान गेल्या तीन आठवडय़ात दादरमधील सक्रिय रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवडय़ात 90 वर स्थिर असलेली सक्रिय रुग्णसंख्या आता पुन्हा 100 वर पोहोचली आहे. दादरमध्ये दिवसाची सरासरी रुग्णसंख्या घटली असून आज दादरमध्ये 2 रुग्ण सापडले. माहीममध्येही रुग्णसंख्या एक आकडी असली तर त्यात चढउतार होत आहेत. माहीममध्ये आज 6 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 66 वरून पुन्हा 71 वर पोहोचली आहे. धारावीतील सक्रिय रुग्णांची संख्या 40च्या आत स्थिर आहे.

विशेष लसीकरणाची होतेय मदत
धारावीत सिटी बँक आणि जसलोक रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम 27 जूनपासून सुरू करण्यात आली असून यात महिनाभरात एक लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विशेष लसीकरण मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी मोठी मदत होत आहे.

ब्रेक द चेन
रविवारची रुग्णसंख्या
राज्य
रुग्ण 5,508
मृत्यू 151

मुंबई
रुग्ण 323
मृत्यू 9

ठाणे 56
नवी मुंबई 68
नाशिक 38
पुणे 213
नागपूर 4
डोंबिवली 59
संभाजीनगर 4
पनवेल 63
रायगड 103
रत्नागिरी 103
सिंधुदुर्ग 117
पालघर 29