
राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) दिल्ली येथील कार्यालयात मुंबईत घातपाताचा फोन करणाऱयाला गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने अटक केली. शुभम्कुमार अजय पाल असे त्याचे नाव आहे.
येत्या काही दिवसांवर गणोशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबईत गणेशोत्सवात काही अनुचित घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. नुकतेच दिल्लीमध्ये दोन दहशतवादी घुसल्याने तपासयंत्रणा ऍलर्ट झाल्या आहे. असे असतानाच गुरुवारी शुभम्कुमारने ‘एनआयए’च्या दिल्ली कार्यालयात फोन केला. मुंबईत काही अनुचित घटना घडणार आहेत असे सांगून त्याने फोन ठेवला. त्यानंतर तपासयंत्रणा कामाला लागल्या. मुंबई पोलिसांनी देखील गुरुवारी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली होती. क्यूआरटी, स्थानिक पोलिसांनी रेल्वे स्थानक, मॉल्समध्ये तपासणी केली. एनआयएच्या कार्यालयात फोन करणाऱयाचा गुन्हे शाखेचे पोलीस शोध घेत होते. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांचे तपासाकरिता पथक तयार केले.
फोन करणारा हा गोरेगाव परिसरात असल्याची माहिती युनिट 11 च्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शुभम्कुमारला गोरेगावच्या नेस्को येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. शुभम्कुमारविरोधात वनराई पोलीस ठाण्यात यूएपीए कायद्याखाली गुन्हा दाखल केला. वनराई पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.


























































