
सीआययूच्या प्रमुख पदाची सूत्र स्वीकारल्यापासून नेहमीच अलिशान गाडय़ांमधून फिरणारा सचिन वाझे 4 मार्चच्या सायंकाळी मात्र पोलीस आयुक्तालयातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात चालत गेला होता. इतकेच नाही तर तो लोकलने कळव्याला गेला होता. तसे सीसीटीव्ही फुटेजच एनआयएच्या हाती लागले आहे. त्यामुळे एनआयएच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा सीएसएमटी स्थानकातील 4 व 5 नंबर प्लॅटफॉर्मवर वाझेला नेऊन ‘तो’ सीन रिक्रिएट करून पाहिला.
मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी म्हणजे 4 मार्चचे एक सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागले आहे. त्या रात्री मारेकऱयाने हिरेन यांना तावडे नावाने पह्न करून बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याच रात्री त्यांची हत्या करून मृतदेह मुंब्रा खाडीत फेकण्यात आला होता. वाझे 4 मार्चला पोलीस आयुक्तालयातून चालतच बाहेर पडला. तेथून त्याने चालत सीएसएमटी स्थानक गाठले. मग लोकल पकडून वाझे सवाआठच्या सुमारास कळवा स्थानकात उतरला. त्यानंतर रात्री उशिरा तो मुंबईत परतला आणि डोंगरीत येऊन एका बारवर कारवाई केल्याचे नाटक केले.
म्हणून वाझेचा प्लॅन फसला
हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी वाझेने ठाणे गाठण्यासाठी पद्धतशीर प्लॅन केला होता, पण सीसीटीव्हीमुळे वाझेचा प्लॅन फसला. त्या दिवशीच्या सायंकाळची त्याची हालचाल सीसीटीव्हीत पैद झाल्याने एनआयएने त्याआधारे तो सीन रिक्रिएट करून पाहिला. सोमवारी रात्री उशिरा एनआयएचे पथक वाझेला सीएसएमटी स्थानकात घेऊन गेले. मग फलाट क्रमांक 4 व 5 वर लाल रंगाचे टेपिंग करून वाझेला चालायला लावले. यावेळी पुण्यावरून आलेले फॉरेन्सिकचे पथकदेखील हजर होते. सीसीटीव्हीतील फुटेजनुसार या पथकांनी वाझेची परेड करून घेतली. याआधी अॅण्टेलियाजवळ वाझेला कुर्ता घालून चालायला लावण्यात आले होते.

































































