मराठी भाषा दिनानिमित्त ‘लोकाधिकार’चा मराठी जागर; बिर्ला मातुश्री सभागृहात विशेष कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठीचा जागर केला जाणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जाणार आहे. त्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन या कार्यक्रमात लाभणार आहे. त्याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून लोकाधिकार महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा केला जात आहे. यंदा मरीन लाइन्स येथील मुंबई रुग्णालयाशेजारील बिर्ला मातुश्री सभागृहात 27 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महासंघाने विविध कार्यकारी समित्या बनवून त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी सोपवली आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिगण, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच महासंघाच्या संलग्न समित्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित ‘माझी माय सरसोती’ हा नृत्य नाटय़ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महासंघाच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

शिवरायांच्या ‘जगदंब’ तलवारीची प्रतिकृती उद्धव ठाकरे यांना भेट देणार

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘जगदंब फिरंग’ तलवारीची 48 इंच लांबीची हुबेहूब प्रतिकृती भेट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे सडेतोड वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिके देऊन गौरव केला जाणार आहे.