
अभिनेते प्रशांत दामले-कविता मेढेकर यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा स्वागत सोहळा येत्या रविवारी रंगणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून, कोरोनाचे सर्व नियम पाळत हा सोहळा 21 मार्चला मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात दुपारी 4.30 चा प्रयोग झाल्यानंतर लगेचच पार पडणार आहे.
सध्या कोरोनामुळे सर्वच जण तणावात असताना अशा हलक्याफुलक्या, हास्याची लस देणाऱया नाटकांचे प्रयोग जास्तीत जास्त व्हावेत, या हेतूने अशोक मुळ्ये यांनी या स्वागत सोहळ्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा पहिला प्रयोग नोव्हेंबर 2018 मध्ये झाला. अद्वैत दादरकर या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. लॉक डाऊनचे दहा महिने वगळून 250 दिवसांत 400 प्रयोग सादर झाले. याचे औचित्य साधून, ज्या नाटकाचा जन्म मुंबईत झाला, ज्या नाटकाचे सर्वात जास्त प्रयोग मुंबईत झाले, तिथे विशेष कार्यक्रम करावा असा अशोक मुळ्ये यांचा आग्रह होता. त्याला प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने होकार दिला.
n 1993 च्या साखळी बॉम्बस्पोटावेळी दादर स्थानकाबाहेर स्पूटरमध्ये लपवून ठेवलेला जिवंत आरडीएक्स बॉम्ब निकामी करणारे निवृत्त मेजर वसंत जाधव यांचा विशेष सन्मान हेही या सोहळ्याचे वैशिष्टय़ आहे.

























































