मिठी नदी खळखळून वाहणार! रुंदीकरण, खोलीकरणासाठी पालिका 569 कोटी खर्च करणार

मुंबईची ओळख असूनही प्रदूषण आणि अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे दुरवस्था झालेली मिठी नदी लवकरच खळखळून वाहू लागणार आहे. पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण केल्यामुळे हे शक्य होणार आहे. पुढील दोन वर्षात होणाऱ्या या कामासाठी पालिका 569 कोटी 52 लाख रुपये खर्च करणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

मिठी नदीच्या कामासाठी पालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विशेष प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आगामी काळात हे काम आणखी प्रभावीपणे केले जाणार आहे. मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम चार टप्प्यांमध्ये होत आहे. यामध्ये विनामतळ टॅक्सीवे पुल कुर्ला ते अशोक नगर अंधेरी पुर्व किनारा, विमानतळ टॅक्सी वे पुल कुर्ला ते अशोक नगर पश्‍चिम किनारा, वांद्रे कुर्ला संकुल एमटीएनएल ते विमानतळ टॅक्सी वे पुल कुर्ला, अशोक नगर अंधेरी ते पवई फिल्टरपाडा या टप्प्यांमध्ये काम होणार आहे. महापालिकेने हे प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात बैठकीत मांडले होते. मात्र स्थायी समितीने तेव्हा हे प्रस्ताव फेटाळले होते. मात्र आता झालेल्या बैठकीत पुन्हा प्रशासनाकडून हे प्रस्ताव मांडण्यात आले. या सर्व प्रस्तावात स्थायी समितीत मंजुरी दिली. नदीतून काढलेले दगड मातीची व्हिलेवाट कंत्राटदारालाच लावावी लागणार आहे. नदीच्या किनाऱ्यावर अतिक्रमण असल्याने काम विलंबाने सुरु होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंत्राटदारांनी वाढीव दर दिल्याचे प्रशासनाकडून प्रस्तावात नमुद करण्यात आले. मात्र कंत्राटदारांशी वाटाघाटी केल्यानंतर कंत्राटदार 18 ते 22 टक्के कमी दराने काम करण्यास तयार झाला आहे.

… तर प्रतिमहिना 10 लाखांचा दंड

मिठी नदीचे प्रदुषण रोखण्यात महानगर पालिकेला अपयश आलेले असल्याने राष्ट्रीय हरीत लवादाने पालिकेला प्रति महिना 10 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे काम नियोजीत वेळेत पुर्ण करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये नमुद केले आहे. यात नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याबरोबरच नदीत येणारे सांडपाणी अडविण्यात येणार आहे. शिवाय मैला आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या बाजुने वाहीनी तयार करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या