
सामना प्रतिनिधी। मुंबई
कोकणात पावसाने कहर केला आहे. मुंबईतही गेले तीन दिवस सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही इतका पाऊस भरला आहे. शुक्रवार-शनिवारच्या मुसळधार सरींनी मुंबईकर सुखावला होता. विकेंड पावसात मनसोक्त चिंब भिजण्याचे प्लॅनही सर्वांनी केले होते, पण पावसाने सकाळपासूनच दडी मारल्याने मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले.
आभाळ ढगांनी दाटले होते. वातावरणही चांगले दिसत होते. फक्त हवा होता पाऊस. त्यासाठी सकाळपासूनच मुंबईकरांची चौपाटय़ांवर गर्दी झाली होती, पण मुसळधार पाऊस बरसलाच नाही. चौपाटय़ांवर फक्त हवा होती. पावसाने जोरदार हजेरी न लावल्याने मुंबईकरांचा रविवार सुकाच गेला. पावसाची फक्त चिरचिर, रिपरिप सुरू होती. मनासारखा पाऊस अनुभवता न आल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. मुंबई शहरावर पाऊस बरसलाच नाही. उपनगरांमध्ये मात्र चांगल्या पावसाची नोंद झाली. मालाड, गोरेगाव, कांदिवली भागात चांगला पाऊस झाला. पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंड, पवई येथेही चांगल्या पावसाची नोंद झाली. शहरातील नागरिक मात्र पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
येत्या 24 तासांत जोरदार पाऊस
अरबी समुद्रात हवेचा दाब वाढल्याने मुंबईसह कोकणात येत्या 24 तासांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील चार दिवस मुंबईसह ठाणे आणि परिसरात जोरदार पाऊस होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कुलाबा येथे 12.4 मि. मी. तर सांताक्रुझ येथे 8.2 मि. मी. पावसाची नोंद झाली.
पावसाची नोंद (मिमी)
कुलाबा 78.7
वरळी 44.80
माझगाव 72.7
दादर 38.20
वांद्रे 42.60
बीकेसी 113.00
सांताक्रुझ 52.80
अंधेरी 89.20
गोरेगाव 99.60
मालाड 125.60
कांदिवली 65.60
बोरिवली 46 .80
चेंबूर 82.80
विद्याविहार 76.60
पवई 73.40
जोगेश्वरी 22.00
भांडुप 65.20
मुलुंड 99.20




























































