
>>रतींद्र नाईक<<
मुंबईकरांचा प्रवास चकचकीत आणि गुळगुळीत रस्त्यावरून व्हावा यासाठी शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करणार, असे गाजर दाखवणाऱ्या महायुती सरकारचे आश्वासन पाण्यात गेले आहे. यंदाच्या पावसात तब्बल 27 हजार 334 खड्डे पडले असून मुंबई पुरती खड्डय़ात गेली आहे. खुद्द पालिकेनेच हायकोर्टात ही माहिती दिली असून या खड्डय़ांमधून प्रवास करताना मुंबईकरांचे कंबरडे मोडत आहे.
शहरातील खड्डय़ांचे गांभीर्य लक्षात घेऊन हायकोर्टाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी माहिती देताना खंडपीठाला सांगितले की, मुंबईत सुमारे 2050 किमी लांबीचे रस्ते असून या रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण केले जात आहे. एक हजारहून अधिक किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम मे 2027 पर्यंत पूर्ण होईल. याशिवाय अनेक रस्ते हे एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट व इतर प्राधिकरणाच्या ताब्यात असून त्याची देखभाल संबंधित प्राधिकरणाकडून केली जाते.
दूरध्वनी, एक्सच्या माध्यमातून तक्रारी
खड्डय़ांची तक्रार नोंदवण्यासाठी 1916 हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला असून एक्स, व्हॉट्सऍप व मोबाईल ऍपच्या माध्यमातून मुंबईकर तक्रारी नोंदवतात. वॉर्ड निहाय या तक्रारींचा आढावा घेतला जात असल्याचे पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी सांगितले.
पालिका म्हणते 688 खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर
मुंबईत यंदाच्या मान्सूनमध्ये 27 हजार 334 खड्डय़ांच्या तक्रारी आल्या असून केवळ 688 खड्डे बुजवण्याचे काम शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 227 वॉर्डात पालिकेने इंजिनीअरची नेमणूक केली आहे. तक्रार आल्यावर हे खड्डे 48 तासांत बुजवले जातात, असे वकिलांनी सांगितले. तर 2023 साली खड्डय़ांच्या 59 हजार 533 तक्रारी आल्या असून त्या तक्रारींची दखल घेण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.