64 हजार कर्मचारी निवडणूक ड्युटीवर! महापालिका क्षेत्रात 10 हजार 231 मतदान केंद्रे

फोटो - चंद्रकांत पालकर

मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून 64 हजार 375 कर्मचारीअधिकारी इलेक्शन डय़ुटीवर आहेत. तर 10 हजार 231 मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. पालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मुंबईत 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी हजर राहणे अनिवार्य असून दांडी मारल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

पालिकेने मतदानासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान अधिकारी यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सध्या विविध ठिकाणी सुरू आहे.  हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे व अनिवार्य असून, निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तरीही जे अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिले आहेत, त्यांनी तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्याशी संपर्क साधून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 214 ते 222 साठी एकूम 467 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी एकूण 610 ईव्हीएम सुसज्ज करण्यात येत आहेत. राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी या ठिकाणी जाऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि सर्व अधिकाऱ्यांसह विविध उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते.