मुंबईत भाजपचे अजित पवार गटाशी गुफ्तगू! 50 जागांचा प्रस्ताव, शिंदे गट अस्वस्थ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून धुसफुस सुरू झाली आहे. नवाब मलिकांचे नेतृत्व नको म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी अजितदादा गटाशी गुफ्तगु सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील  तटकरे यांनी 50 जागांचा प्रस्ताव भाजपकडे दिल्याची चर्चा आहे.  यामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 227 पैकी 150 जागा कोणत्याही परिस्थितीत लढवायच्या अशी भूमिका भाजपने घेतली आहे. 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 82 जागांसह शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांच्या जागांवर भाजपकडून दावा केला जात आहे, मात्र शिंदे गटाकडून याला होत असलेल्या विरोधामुळे भाजपने मुंबईत अजित पवार गटाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री सुनील तटकरे यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई पालिका निवडणूक एकत्र येऊन लढण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर तटकरे आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी मंत्री आशीष शेलार यांच्यात बैठक झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

अधिकच्या जागांसाठी दबावतंत्राची खेळी ?

महायुतीच्या जागावाटपाच्या पहिल्या दोन बैठकांमध्ये अजित पवार गट कुठेही नव्हता. नवाब मलिक नेतृत्व करणार असतील तर त्यांच्यासोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे मांडली होती. त्यानंतर अचानकपणे भाजपच्या नेत्यांनी अजितदादा गटाशी गाठीभेटी सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून अधिकच्या जागांसाठी दबावाची खेळी तर यामागे नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप-शिंदे गटात 77 जागांचा तिढा

भाजपने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या अलीकडच्या काळात अन्य पक्षातून जे प्रवेश झाले आहेत अशा 87 जागा भाजपने लढवाव्यात. तर शिवसेनेचे जे नगरसेवक शिंदे गटात आहेत तसेच कॉँग्रेस व अन्य पक्षातून ज्यांनी प्रवेश केला आहे अशा 63 जागा शिंदे गटाला देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. 227 पैकी 150 जागांवर एकमत झाले असून दोन्ही पक्षांत 77 जागांवरून तिढा आहे.

काँग्रेसचे एकला चलो रे!

राज्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची तयारी दर्शविणाऱ्या कॉँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मात्र ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज आज यासंदर्भातील घोषणा केली. मुंबईतील सर्व 227 जागा लढविण्याची तयारी मुंबई कॉँग्रेसने केली असल्याचे ते म्हणाले. मुंबई काँग्रेस संसदीय कार्य समितीच्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला माध्यमांशी बोलले. स्वबळावर लढण्याची मुंबईतील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.