
सामना प्रतिनिधी। मुंबई
घाटकोपरमध्ये सोमवारी भरदिवसा बबलू दुबे ऊर्फ चोटी (40) याची तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना घडली. तिघा आरोपींपैकी दोघेजण पोलिसांपुढे शरण आले असून तिसऱया आरोपीचा शोध सुरू आहे. दुबेच्या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करीत आहेत.
पंतनगर येथे राहणारा बबलू दुबे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळीदेखील घाटकोपर पश्चिमेकडील जागृतीनगर मेट्रो रेल स्टेशन येथे आला होता. तेथील ताहेरा मस्जिदी जवळील एका चायनिजच्या गाडय़ाजवळ बसलेला असताना साडेअकराच्या सुमारास एका रिक्षातून तिघेजण तेथे आले आणि काही समजायच्या आतच तिघांनी धारदार शस्त्राने बबलूवर वार करण्यास सुरुवात केली. बबलू रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघांनी तेथून पळ काढला. गंभीर जखमी बबलूला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान आरोपींपैकी विजय आखाडे (37) आणि संजय पटवा या दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली असून तिसरा आरोपी गोपाळ नाडर (34) याचा शोध सुरू आहे. हे तिघे आरोपी रेकॉर्डवरचे असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मारेकरी संतोष माने गँगचे
बबलू दुबे याची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असून दुबेचे मारेकरी हे संतोष माने उर्फ छोटा बॉस याच्या टोळीचे आहेत. पंतनगर परिसरात राहणाऱया दुबेचे संतोष माने याच्यासोबत वाद होता. तोच वाद दुबे याला महाग पडला असे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र पोलिसांकडून अद्याप दुबेच्या हत्येची सुपारी कोणी व का दिली याबाबत समजू शकले नाही.


























































