उत्तर-पूर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला कमजोर

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात माजी नगरसेवक हारुन खान व नंदकुमार वैती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून त्याचा फायदा या मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांना होणार असल्याची चर्चा आहे.

या मतदारसंघात महायुतीचे मनोज कोटक व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे संजय पाटील यांच्यात थेट लढत आहे. निवडणूक प्रचार रंगात आलेला असताना मुलुंड (पू.)मधील माजी नगरसेवक नंदकुमार वैती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला तर घाटकोपर पश्चिममधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारुख खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही माजी नगरसेवकांची ताकद महायुतीला मिळणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या मतदारसंघातील ताकद कमी झाली आहे. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या मतदारसंघातील ताकद वाढलेली नाही आणि राजकीय ताकद वाढवण्याचा काँग्रेसने प्रयत्नही केला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारापुढील अडचणी वाढल्या असून या मतदारसंघात महाआघाडीला मोठा फटका बसणार असे राजकीय निरीक्षक सांगतात.