सहा बिल्डरांनी शिवशाहीचे 96 कोटी भाडे थकवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरातील सहा बिल्डरांनी शिवशाही पुनर्वसन प्राधिकरणाचे तब्बल 96 कोटी रुपये भाडे थकवले आहे. दंडाची आणि वार्षिक वाढीची रक्कम अर्ध्यावर करूनदेखील बिल्डर थकीत भाडे भरत नसल्यामुळे वसुली कशी करायची, असा प्रश्न आता शिवशाही प्राधिकरणापुढे आहे.

झोपडय़ांचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांची तात्पुरती निवाऱयाची सोय म्हणून बिल्डर त्यांना संक्रमण शिबिरात घरे देतात. त्यासाठी बिल्डर शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून संक्रमण शिबिरे भाडेतत्त्वावर घेतात. 40 हजार रुपये डिपॉझिट आणि 7 हजार रुपये भाडे एका घरासाठी शिवशाहीकडून आकारले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बिल्डरांनी थकीत भाडे भरले नसल्याने थकबाकीचा आकडा 116 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

थकीत भाडे वसूल करण्यासाठी शिवशाहीने संबंधित बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस बजावली. काही बिल्डरांनी थकीत रकमेवर लावल्या जाणाऱया व्याजाचा दर कमी करण्याची मागणी केली. त्यानुसार 16 टक्के दंड 8 टक्क्यांवर आणि वार्षिक वाढ दहा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणली. तरीदेखील बिल्डर थकीत भाडे भरत नसल्याचे शिवशाहीच्या एका अधिकाऱयाने सांगितले.