
पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांत प्रवाशी संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या प्रवाशी संख्येचा विचार करून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) प्रवाशी सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कांदिवली रेल्वे स्थानकात तब्बल 132 मीटरचा एलिव्हेटेड डेक सुरू करण्यात आला आहे. ‘एमयूटीपी-3ए’ प्रकल्पा अंतर्गत या डेकचे काम केले आहे.
कांदिवली हे पश्चिम उपनगरातील वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. येथे प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्याच्या अनुषंगाने एमआरव्हीसीने एलिव्हेटेड डेकच्या कामाला गती दिली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील 132 मीटर लांबीचा एलिव्हेटेड डेक अखेर प्रवाशी सेवेत दाखल झाला आहे. नवीन डेकमुळे प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होईल, प्रवाशांना सोयीस्करपणे ये-जा करता येईल. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एमआरव्हीसी टप्प्याटप्प्याने ही कामे करीत आहे, अशी माहिती एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
अतिरिक्त डेकचे काम अंतिम टप्प्यात
एमआरव्हीसीमार्फत कांदिवली स्थानकात इतरही प्रवाशी सुविधांची कामे केली जात आहेत. त्यापैकी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उत्तर आणि मध्य फूटओव्हर ब्रिजला (एफओबी) जोडणाऱ्या अतिरिक्त 100 मीटर लांबीच्या एलिव्हेटेड डेकचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे एमआरव्हीसीतर्फे सुनील उदासी यांनी स्पष्ट केले.





























































