
गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची चादर असून धुलिकणांमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. प्रदूषण वाढल्यामुळे अखेर आज मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून घराबाहेर पडल्याचे दिसले. बीकेसी, मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी येथील हवा खराब असल्याची नोंदच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर झाल्याचे दिसले.
प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून मुंबईकरांचा श्वास अक्षरशः गुदमरल्याचे चित्र आहे. मुंबईकरांनी सकाळी मार्ंनग वॉकसाठीही बाहेर पडू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. तर प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धुरक्यामुळे दृश्यमानताही कमी झाली असून दक्षिण आणि मध्य मुंबईत अनेक ठिकाणी वाहने अतिशय सावकाश चालवावी लागत आहेत.
सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
घसरलेला पारा आणि धुलिकण तसेच प्रदूषण यामुळे सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. प्रदूषण प्रचंड वाढल्यामुळे श्वसनाचे आजार जडू शकतात. त्यामुळे शक्यतो बाहेर पडल्यानतंर मास्क वापरावा, असे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. सचिन आल्मेल यांनी सांगितले.
थंड हवामानामुळे हवा खेळती नाही
पारा घसरल्यामुळे हवा खेळती नाही. परिणामी हवेत धुलिकण साचून राहत असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले.

























































