
मुंबईमध्ये सध्या व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे पालिकेची रुग्णालये अक्षरशः हाऊसफुल झाली आहेत. सद्यस्थितीत एका बेडवर दोन रुग्णांना उपचार देण्याची वेळ पालिकेवर आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात मोफत आणि दर्जेदार उपचार मिळत असल्यामुळे येणाऱया गोरगरीब रुग्णांना उपचाराशिवाय माघारीदेखील पाठवता येत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
मुंबईत विश्रांती घेत पडणाऱया पावसामुळे पाणी साचून राहिल्याचे प्रकार घडत आहेत. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात.
अशी घ्या काळजी
पाणी उकळून प्या. जखम झाली असल्यास साचलेल्या पाण्यातून जाणे टाळा. तसेच थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नका.
शीव रुग्णालयाची सद्यस्थिती
पालिकेच्या शीव रुग्णालयात ओपीडीमध्ये येणाऱया रुग्णांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळेच एका बेडवर दोन रुग्ण ठेवावे लागत आहेत.
शीव रुग्णालयात एपूण 1900 बेड आहेत. यामध्ये 228 आयसीयू बेड आहेत. तर इतर बेड विविध आजारांच्या रुग्णांसाठी आहेत. मात्र रुग्णालयात दररोज येणाऱया रुग्णांची संख्याच जास्त असल्याने बेडची कमतरता पडत आहे.