
अलीकडेच केईएम इस्पितळातून एका दोन वर्षांच्या मुलाची चोरी झाल्याच्या घटनेने पालिका रुग्णालयांमध्ये केअर टेकरच्या नावाने आसरा घेणाऱयांचा गंभीर प्रश्न चव्हाटय़ावर आला आहे. रुग्णालयातील गर्दीचा गैरफायदा घेत काही भामटे केअर टेकर म्हणून तेथे आसरा घेतात आणि संधी मिळताच हातसफाई करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे बोगस केअर टेकरची डोकेदुखी वाढली असून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याचे रुग्णांचे नातवाईक सांगतात.
16 सप्टेंबरच्या रात्री केईएम रुग्णालयातून एका दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. मुलाच्या आजीकडून त्याला खेळविण्याच्या बहाण्याने घेऊन 42 वर्षांची व्यक्ती मुलाला घेऊन पसार झाली होती. पण सुदैवाने वेळीच त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडून मुलाची सुखरूप सुटका केली होती. अनंत उदलकर नावाचा व्यक्ती चार दिवस केअर टेकर म्हणून केईएममध्ये काम करत होती. त्यानेच हे कांड केल्यानंतर पालिका रुग्णालयांमध्ये बेकायदेशीरपणे केअर टेकरच्या नावाखाली आसरा घेणाऱयांची समस्या समोर आली आहे. काही महिला तसेच पुरुष परस्पर रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून केअर टेकरचे काम मिळवतात. यामुळे त्यांची तेथे राहण्याची व खाण्या – पिण्याची सोय होते.
इतकेच नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल, रोकड आदी लंपास करतात. त्यामुळे पालिका सुरक्षा रक्षकांनी गर्दीकडे दुर्लक्ष करू नये. तरच बोगस केअर टेकर व चोरांचा बंदोबस्त होईल, असे रुग्णांचे नातेवाईक सांगतात.
- गतवर्षी शीव व केईएम रुग्णालयातून 16 मोबाईल चोरीला गेले होते. त्यापैकी 10 मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. तर यावर्षी आतापर्यंत 17 मोबाईल चोरीला गेल्याची नोंद असून त्यापैकी 12 मोबाईल पोलिसांनी परत मिळवले आहेत. इतकेच नाही तर केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाला चोरून नेल्याची देखील घटना गेल्या महिन्यात घडली होती.
केईएम, शीव या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये पालिका सुरक्षा रक्षकांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. कोणी संशयास्पद
दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- केअर टेकर ठेवण्यासाठी प्रक्रिया आहे. अधिष्ठाता यांना आधी तसा अर्ज करावा लागतो. मग सदर अर्ज वरिष्ठ एएमओ यांच्या सहीनिशी संबंधित वॉर्ड इन्चार्ज यांच्याकडे पाठविला जातो. मग हे इन्चार्ज केअर टेकरची गरज आहे किंवा नाही ते पाहून अर्ज सुरक्षा कार्यालयात पाठवितात. त्यानंतर सुरक्षा कार्यालय सदर व्यक्तीचे आधार कार्ड व आवश्यक माहिती घेऊन त्याला ठेवायचे की नाही ते ठरवतात. अशी प्रक्रिया असल्याचे केईएमच्या अधिष्ठाता संगीता रावत यांनी सांगितले.

























































