
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे यंदा लवकर आगमन होणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या बाप्पाच्या उत्सवासाठी गावी जाण्याचे वेध चाकरमान्यांना लागले आहेत. त्यांच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून नियमित गाडय़ांचे बुकिंग येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर आता चाकरमान्यांची जागरणं पाहायला मिळणार आहेत.
गणेशोत्सव आणि कोकणचे वेगळेच नाते आहे. दरवर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून लाखो चाकरमानी आपल्या कुटुंबकबिल्यासह गणेशोत्सवासाठी गावी जातात. यंदा मागील वर्षीपेक्षा लवकर म्हणजे 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोकणातील गावी जाण्यासाठी 60 दिवस आधी रेल्वे गाडय़ांचे आरक्षण करावे लागणार आहे. गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी बहुतांश चाकरमानी काही दिवस आधी गावी पोहोचतात. त्यादृष्टीने 22 ऑगस्टला गावी जाण्याचे प्लॅनिंग करणाऱया चाकरमान्यांना सोमवारपासून नियमित बुकिंग करावे लागणार आहे. गावी जाणाऱया चाकरमान्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून स्पेशल गाडय़ांचे नियोजन केले जाणार आहे.
पुरेशा प्रमाणात ज्यादा गाडय़ांची व्यवस्था करा
कोकणात जाणाऱया रेल्वेगाडय़ांना प्रचंड गर्दी होते. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर 250हून अधिक गणपती जादा गाडय़ा सोडते. त्या गाडय़ांनाही मोठी गर्दी असते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात ज्यादा गाडय़ांची व्यवस्था करा आणि गाडय़ांना विलंब होणार नाही याचीही खबरदारी घ्या, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे बळीराम राणे यांनी केली आहे.
साठ दिवस आगाऊ आरक्षणाचा तक्ता
आरक्षण प्रवासाची
दिनांक दिनांक
23 जून 22 ऑगस्ट
24 जून 23 ऑगस्ट
25 जून 24 ऑगस्ट
26 जून 25 ऑगस्ट
27 जून 26 ऑगस्ट
28 जून 27 ऑगस्ट
29 जून 28 ऑगस्ट
30 जून 29 ऑगस्ट
1 जुलै 30 ऑगस्ट
2 जुलै 31 ऑगस्ट
3 जुलै 1 सप्टेंबर
4 जुलै 2 सप्टेंबर























































