
विवाहित असूनही ऑनलाईन विवाह नोंदणी करणे एका वकील महिलेला चांगलेच महागात पडले आहे. विवाहसंस्थेत ओळख झालेल्या कथित डॉक्टरने महिलेशी गोड बोलत तिला सहा लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडित महिला वकील पती आणि मुलासोबत मुंबईत राहते. तिने ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवर जुलै महिन्यात नोंदणी केली होती. तिचे प्रोफाईल पाहून मोहित गुप्ता नामक तरुणाने तिला रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि त्यांच्यात बोलणे सुरु झाले.
मोहितने महिलेला आपण न्यूयॉर्क येथे डॉक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर अमेरिकन सरकारने गाझा येथे आपली नेमणूक केल्याचे त्याने पीडितेला सांगितले. महिलेने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांनी मोहितने तिला एक ई-मेल आयडी देत त्यावर त्याच्या सुट्टीचा अर्ज तयार करून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे महिलेने अर्ज तयार करून पाठवला. त्यानंतर गाझा येथे असल्याने आपल्याला आर्थिक व्यवहार करता येत नसल्याचे सांगत गाझा ते भारत प्रवासासाठी पैसे पाठवण्यास सांगितले.
मुंबईत आल्यावर पैसे परत करतो सांगितल्याने महिलेने मोहितला दोन लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर त्याने विमानाचे तिकिट महिलेला पाठवले. त्यानंतर विमानतळावर अडवले असून डॉलर खर्च करता येत नाहीत सांगत सहा लाख रुपये मागितले. महिलेने पैसे दिलेही. मग क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी पुन्हा पैशांची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिला. त्यानंतर मोहितने महिलेशी संपर्क बंद केला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने बोरीवली पोलीस गाठत तक्रार दाखल केली.