
मध्य रेल्वेच्या मेन लाईन मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक बुधवारी देखील विस्कळीत राहिले. टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) येणाऱ्या अनेक लोकल ट्रेन विलंबाने धावत आहेत. जवळपास 20 ते 35 मिनिटे उशिराने गाड्या धावत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मंगळवारी सकाळी अशाच प्रकारे अप दिशेने येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते.
मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे. मेल- एक्सप्रेसला प्राधान्याने मोकळी वाट करून दिली जात असल्याने लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. याचा नोकरदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच समस्येवरून संतप्त झालेल्या प्रवाशांनी मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील स्टेशन मास्तरांना जाब विचारला होता. त्यानंतरही लोकल सेवेचे वेळापत्रक पाळण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी दुपारी कसारा रेल्वे स्थानकातून 12 वाजून 19 मिनिटांनी सुटणारी कसारा- सीएसएमटी लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावली. गाडीची टिटवाळा येथील वेळ झाली तरी संबंधित लोकल आटगाव रेल्वे स्थानकाच्या जवळ रखडली होती. लोकल सेवेच्या या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत.

























































