
फूड पार्सल आणण्याच्या वादातून चार मित्रांनी केलेल्या मारहाणीत 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. मोहम्मद जावेद असिक अली खान असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी चारही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9 वाजता जरीमारी येथील मुस्लिम सोसायटी परिसरात ही घटना घडली. जावेद खान आणि त्याच्या मित्रांमध्ये फूड पार्सल आणण्यावरून जोरदार वाद सुरू झाला. पाहता पाहता या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. मुख्य आरोपी शेहबाज खानने त्याचे वडील आणि दोन काकांसह जावेद खानला हातांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात जावेदला गंभीर दुखापत झाली.
यानंतर रात्री 10 वाजता जखमी जावेदने त्याचा मित्र अब्दुल कादिर याला फोन करून हल्ल्याची माहिती देत मदतीची याचना केली. कादिरने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जावेदला एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला सरकारी रुग्णालयात रेफर केले. त्यानंतर कादिरने त्याला कुर्ला येथील भाभा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी मध्यरात्री 12 वाजता जावेदला मृत घोषित केले.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी साकीनाका पोलिसांना घटनेची माहिती दिली. जावेदचा मित्र अब्दुल कादिरच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींविरधत हत्या आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
            
		





































    
    






















