मोतीलाल नगरमधील रखडलेली पावसाळी कामे मार्गी लागणार, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

पावसाळ्याला सुरुवात झाली तरी गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर नं. 1 मधील पावसाळी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी या परिसरातील पावसाळी कामांची पाहणी केली. शिवसेनेच्या दणक्यानंतर येथील रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

प्रभाग क्र. 58 मधील मोतीलाल नगर नं. 1 येथील रस्त्यांची कामे, नालेसफाई, गाळ हटवणे अशी अनेक कामे पावसाळा सुरू झाला तरी पूर्ण झालेली नाहीत. परिणामी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत येथील कामांची पाहणी केली. यावेळी शाखा संघटक शोभना सकपाळ, दिशा दळवी, उपशाखाप्रमुख विनोद माने, गटप्रमुख रमेश पवार, शिवसैनिक सुखदेव कारंडे, महेंद्र इंगवे, समीर राजपूरकर, युवासेनेचे सागर सक्रे, महापालिकेचे अधिकारी नीलेश नारकर, इंदुलकर तसेच रहिवासी उपस्थित होते.

गोरेगावात पावसाळ्यात मैदानांत पाणी तुंबते. त्यामुळे मैदानाच्या आसपासचे मॅनहोल काढून स्वच्छ करावेत तसेच इंदिरा नगर येथील पंपिंग स्टेशनमधील बंद पडलेले पंप लवकर सुरू करावेत, अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली. त्यावर रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.

म्हाडा वसाहतीत डेब्रिजचे ढीग

मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतीत बांधकामाचे ढिगारे पडले आहेत. म्हाडाने हे डेब्रिज अद्यापही हटवले नाही. त्यामुळे पावसाळ्यात हे डेब्रिज पाण्यासोबत वाहत जाऊन गटारे तुंबण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात येथील गटारे तुंबून रहिवाशांना त्रास झाल्यास याला म्हाडा जबाबदार असेल, अशा इशारा दिलीप शिंदे यांनी दिला.